रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा उच्चांक; एकाच दिवसात आढळले एवढे रुग्ण


रत्नागिरी – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन जुलै अखेरपर्यंत वाढवलेला असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ४७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा रूग्णालय १७, कळंबणी (खेड) १३, दापोली ग्रामीण रूग्णालय १२, कामथे (चिपळूण) उपजिल्हा रूग्णालय आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय प्रत्येकी २ आणि मंडणगड येथील एका रुग्णाचा समावेश असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६१ एवढी झाली आहे.

रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या १ ते ८ जुलै हा आठवडाभर कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. दरम्यान रत्नागिरी पोलिस अधीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Leave a Comment