राज्याचे कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असतानाच राज्यातील कोरोनाविरोधातील लढ्यात पहिल्या फळीत लढणाऱ्या यंत्रणेत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तिथे व्हेंटिलेटर ठेवल्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

12 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची घोषणा केली होती. या टास्क फोर्सची स्थापना कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी करण्यात आली होती. यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत.

सरकारला या टास्कमार्फत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून संजय ओक संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊनसंजय ओक हे देखील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत जवळपास 80 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर महाराष्ट्रात हा आकडा 1 लाख 75 हजारांच्या जवळपास आहे.

Leave a Comment