अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा ट्रेलर रिलीज


अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेबसिरीजची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. अभिषेक या सिरीजच्या माध्यमातून वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या सिरीजमधील अभिषेकचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगल्यानंतर आता या सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

रिलाज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये अपहरण झालेल्या एका मुलीची आणि तिला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या वडिलांची कथा दाखविण्यात आली आहे. एका त्रिकोणी कुटुंबातील लहान मुलीचे अपहरण होते. तिचे वडील मुलीला शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात. पण त्यांचा हा प्रवास नेमका कुठपर्यंत जातो, हे सिरीज रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.

दरम्यान, येत्या १० जुलै रोजी सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक बच्चनसह या सिरीजमध्ये सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. हा निथ्या मेननचादेखील डिजिटल डेब्यु असल्याचे सांगितले जात आहे. अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी या सिरीजची निर्मिती केली असून याचे दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केले आहे.

Leave a Comment