भाजप आमदाराकडून महाविकास आघाडी सरकारचा “निर्लज्ज” असा उल्लेख


मुंबई – आज राज्यात सर्वच जण आपआपल्या घरातच आषाढी एकादशी साजरी करत असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे 71 हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका केली आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे.


भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचे बिल फाडले…निर्लज्ज सरकार…, असे म्हटले आहे. यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर सरकारने निर्बंध घातल्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी सरकारकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते.

दरम्यान, संस्थानच्या विश्वस्तांचा सरकार विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज झाला. शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

Leave a Comment