Video : धोनीवरील प्रेमाखातर ब्राव्होचे स्पेशल गाणे; टीझर रिलीज


२०११ साली आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला विकत घेतले. वेस्ट इंडिजचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने असल्यामुळे त्यावर्षी आयपीएल खेळू शकतील की नाही याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर वेस्टइंडिज धाकड फलंदाज ख्रिस गेल लिलाव प्रक्रियेत अनसोल्ड राहिल्याने ब्राव्होनेदेखील आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी आशा सोडून दिली होती. पण २ कोटींच्या मूळ किमतीला चेन्नईच्या संघाने ब्राव्होला संघात स्थान दिले. चेन्नईचा हा डाव चांगलाच उपयुक्त ठरला. त्यानंतर ब्राव्होने २०१९ च्या आयपीएलपर्यंत चेन्नईकडून १०४ बळी टिपले. त्याचबरोबर स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतल्यामुळे ‘पर्पल कॅप’ विजेता ठरण्याचा बहुमानही त्याने पटकावला. याच दरम्यान त्याने एका मुलाखती दरम्यान मला धोनीसाठी काही तरी खास करायचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार चॅम्पियन ब्राव्हो धोनीच्या वाढदिवसासाठी एक खास गाणे घेऊन आला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्राव्होने १ व्हिडीओ पोस्ट केला आहे. ब्राव्होने या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीवर बनवलेल्या गाण्याची झलक गाऊन दाखवली आहे. ७ जुलैला धोनीचा वाढदिवस असतो. हे पूर्ण गाणे त्यादिवशी रिलीज करण्यात येणार असल्याचे ब्राव्होने लिहिले आहे. धोनीने जिंकलेल्या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांचा ब्राव्होने बनवलेल्या या गाण्याच्या टीझरमध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर धोनीची ओळख असलेल्या हेलिकॉप्टर शॉटचेही वर्णन आहे. ब्राव्होच्या गाण्याचा टीझर पाहून आता चाहत्यांना पूर्ण गाण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment