जगातील सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ


मुंबई – राज्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर होत असल्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. व्यापक प्रमाणात या थेरपीचा वापर होण्यासाठी जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात केली जात असल्यामुळे कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी आता अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

प्लाझ्मा थेरपी सुविधा राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातील प्लॅटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास सहभागी झाले होते.


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, प्लाझ्मा थेरपीचा उपयोग गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातील ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करत आहोत. परंपरेनुसार आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. एप्रिलमध्ये राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केल्यानंतर केंद्राकडे आपण परवानगी मागितली आणि त्याचा पाठपुरावा केला, आज त्याला यश आले आहे.

सध्याच्या घडीला कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात, पण येथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देत आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. ज्या रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाला हरवले आहे. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का? यावर विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर आपणास प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी पार पाडावी लागेल. केंद्रीय पथक दीड महिन्यांपूर्वी येऊन गेले, तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र कोरोनाच्या उपचारात जगाच्या पुढे आहे. प्रयत्न आणि प्रयोग करणारे, महाराष्ट्र धाडसी राज्य आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment