ठाकरे सरकारचा राज्यातील लॉकडाऊन वाढीचा आदेश जारी


मुंबई – कोरोनाचे राज्यावर ओढावलेले संकट सध्या अधिकच गडद होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेला लॉकडाउन 30 जुनला संपत असून त्यापुढे काय असा सवाल राज्यातील नागरिकांना पडला होता. त्यातच पाचव्या टप्प्यात राज्यातील अनेक गोष्टींमध्ये शिथिल देण्यात येत आहे. पण अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात न आल्यामुळे जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर काल राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर, राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.

राज्य सरकारचे मिशन बिगिन अगेन सुरु झाले असले तरी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याच पार्श्वभूमीवर रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केले की, अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगिन अगेन सुरु करत आहोत, पण लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानुसार 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाउन सरकारने वाढवला आहे.

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, हा लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला असून मिशन बिगिन अगेननुसार हळू हळू सेवा सुरूळीत करण्यात येतील. पण, हा लॉकडाउन आणि केवळ अत्यावश्यक सुविधा व शिथिलता देण्यात आलेल्या आस्थपनाच शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सुरु राहणार आहेत.

Leave a Comment