आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार मराठा समाज


औरंगाबाद : 7 जुलैला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना आक्रमक झाली आहे. आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा मराठा समाजाने केली असून सरकारच्या विरोधात 23 जुलैपासून तीव्र आंदोलन करणार करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

आत्मबलिदान आंदोलनाला काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावरून सुरूवात होणार आहे. आंदोलनात आरक्षणासाठी बलिदान देणारी 42 कुटुंबे सहभागी होणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा रमेश केरे यांनी दिला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही झाली नाही. त्यामुळे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठी संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रमेश केरे यांनी लेखी निवेदनही पाठवले आहे. तसेच राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा सवालही रमेश केरे यांनी केला आहे.

Leave a Comment