लॉकडाऊन 30 तारखेनंतरही उठणार नाही; पण काही गोष्टी काळजीपूर्वक सुरु करत आहोत


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, त्यावेळी बोलताना 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नसून काही गोष्टी आम्ही काळजीपूर्वक सुरु करत असल्याचे म्हटले आहे. ते यावेळी म्हणाले की, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर भाजी मंडईसह बऱ्याच काही ठिकाणी होणारी गर्दी सरकारच्या चिंतेचा विषय बनत आहे. तुम्ही जर गर्दी कराल तर पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल.

दरम्यान लॉकडाऊन वाढवण्याची मागणी काही जिल्ह्यांमधून करण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधने आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, शिस्तीची आपल्याला जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन 30 तारखेनंतर उठणार नाही, पण आम्ही काही सेवा सुविधा काळजीपूर्वक सुरु करत आहोत. जे मिशन बिगेन अगेन आपण सुरु केले, पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मात करायची आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळला असे, होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री बोगस बियाणांच्या मुद्द्यावर म्हणाले की, अपार कष्ट करुन शेतकरी बियाणे पेरतो आणि ते उगवत नाही. शेतकऱ्यांना ज्यांनी फसवले त्यांच्यावर कारवाई होणारच. शेतकऱ्यांना ज्यांनी फसवले त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून आपल्यासाठी अन्न पिकवत आहे. त्या संदर्भात बी-बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी गोष्ट आहे. मेहनत करून पीक आले नाही तर शेतकरी काय करणार? शेतकरी दादाला मी सांगतो, काळजी करू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुमारे 16000 कोटींचे करार कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्राने केले आहेत. उद्योग आल्यावर अर्थचक्राला गती आणि माझ्या भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. आपण कोरोना एके कोरोना असे करीत नाही आहोत. काही अटीतटी-शर्थी जटील न ठेवता आपण त्यांचे स्वागत करीत आहोत. उद्योजकांनो, महाराष्ट्रात या, तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपणहून कोरोनाला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा, हात तोंडाला सारखा लावू नका. सुविधा, शिथिलता ह्या आरोग्यासाठी दिल्या आहेत, आजाराला बळी पडण्यासाठी नाही. गरज नसताना बाहेर पडलात तर परत लॉकडाऊन करावे लागेल. आता तुम्हाला प्रश्न आहे, लॉकडाऊन करायचे का? असा प्रतिसवाल त्यांनी राज्यातील जनतेला केला.

त्याचबरोबर मी शहरी भागातील लोकांना विशेष सांगतो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हणजेच मलेरिया व डेंग्युचे दिवस आहेत. त्यातच आपली सर्व यंत्रणा सध्या कोरोना विरुद्धच्या युद्धात गुंतले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, कुठेही पाणी साठू देऊ नका. डेंग्युच्या आळ्या ह्या अगदी एका बुचातील साठलेल्या पाण्यापासुन कोठेही तयार होऊ शकतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे. नवीन अंकुर येतात, पालवी फुटते, हिरवे गालिचे पसरतात. पावसाळा एक नवीन जीवन घेऊन येतो. आणि या चांगल्या गोष्टींसह काही वाईटही घेऊन येतो. त्या दृष्टीने येणार्‍या नैसर्गिक आपत्ती जसे पूर, वादळ, साथीचे रोग घेऊन येतो. आपण त्या धरतीवरही तयारी करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे उद्या कदाचित आपले राज्य पहिले ठरेल. प्लाझ्मा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांनी प्लाझ्मादान करावा.

ते म्हणाले की, राष्ट्रीय डॉक्टर दिन एक तारखेला आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुया, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. योगायोगाने 1 तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्‍यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा 1 तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्‍या सर्व डॉक्टर्सचा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, मी तुमच्या वतीने आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी विठुरायाकडे साकडे घालणार आहे. वारकर्‍यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहु द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जात आहे. हेलिकॉप्टरमधुन मी वारी एरियल फोटोग्राफीद्वारे केली. त्या अथांग अवकाशातुन मला सर्व विसरुन विठुमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या रुपातुन मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्वरुप दिसले. वारकर्‍यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment