कोरोनाकाळात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, आतापर्यंत 1 लाख 36 हजार गुन्हे


मुंबई : देशावर ओढावलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असून त्याचपार्श्वभूमीवर देशात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. केंद्राच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि तो कुठेतरी नियंत्रणात यावा म्हणून 22 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियम आणि अटींमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता दिली गेली. पण याकाळात काही नियम कायम ठेवले आहेत. दरम्यान लॉकडाऊन नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली, जो आकडा आता एक लाखांच्या वर गेला आहे.

आतापर्यंत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली असून एक लाख 36 हजार 268 गुन्ह्यांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर 27 हजार 721 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 18 लाख 3 हजार 218 रुपयांचा दंडही आतापर्यंत आकारण्यात आल्यामुळे नियम भंग करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आतापर्यंत आपल्यापासून कोरोनाला लांब ठेवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी आणि पोलिस हे अहोरात्र झटत आहे. या सर्वांना कोरोना योद्धा किंवा कोरोना वॉरिअर म्हणून सुद्धा संबोधले जात आहे आणि अशा कोरोना वॉरिअर्सवरसुद्धा या लॉकडाऊन काळात हल्ले झाले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला करण्याच्या 285 घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 860 जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई केली जात आहे आहे.

सर्व जिल्ह्यात 24 तास पोलीस विभागाचा 100 नंबर हा कार्यरत असतो. या नंबरवर लॉकडाऊनच्या काळात 1,04,724 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंन्टाईन असा शिक्का आहे, अशा 746 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 4,69,275 व्यक्ती क्वारंन्टाईन आहेत. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले, असून हे 84887 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment