आता ई-संजीवनी ओपीडी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घराच्या घरीच होणार मोफत उपचार


मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतांश खासगी रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे इतर आजारावरील उपचार, आरोग्य तपासणी त्याचबरोबर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी अनेकांची तारांबळ होत आहे. आता हीच बाब लक्षात घेता, ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आल आहे. ही सेवा याआधी केवळ संगणकआधारीत असल्याने त्याचा वापर करण्यावर मर्यादा होत्या. आता अँड्राईड आधारित ॲप तयार झाल्याने त्याचा लाभ स्मार्टफोन धारकांना घेता येणार आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. त्याचबरोबर आतापर्यंत या सेवेचा 1600 रुग्णांनी लाभ घेतला आहे. एप्रिलमध्ये राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्याचबरोबर महिन्याभरात या सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात येईल, असे त्यांनी जुनच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार हे ॲप एक महिन्याच्या आत तयार झाले आहे.

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला या अॅपच्या माध्यमातून घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत 1606 जणांनी यासेवेचा लाभ घेतला. ही सेवा आतापर्यंत केवळ संगणक आधारीत ॲप्लिकेशनवर असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होती. मात्र आता मोबाईल ॲप तयार झाल्याने त्याचा वापर सामान्यांकडून अधिक प्रमाणात वाढेल. त्यानुसार आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.

Loading RSS Feed

Leave a Comment