अरेच्चा! म्हैस राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने केला सुट्टीसाठी अर्ज

कोरोना संकटाच्या काळात दिवस-रात्र काम करणारे पोलीस आता थकले आहेत. अनेक पोलीस कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून सुट्ट्यांसाठी अर्ज करत आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आला असून, येथील स्पेशल आर्म्ड फोर्सच्या (एसएएफ) जवानाने सुट्टीसाठी सांगितलेले कारण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. कर्मचाऱ्याने माझ्या म्हशीला माझी गरज असून, तिची काळजी घेण्यासाठी सुट्टी द्यावी, असे अर्जात म्हटले आहे.

मध्य प्रदेशच्या रीवा येथील एसएएफच्या 9व्या बटालियनमध्ये ड्रायव्हर पदावर कार्यरत जवानाने सुट्टीसाठी केलेल्या अर्जात म्हशीची काळजी घ्यायची आहे, असे सांगत सहा दिवसांची सुट्टी मागितली आहे. जवाने सुट्टीच्या अर्जात आई आजारी आहे व म्हशीची सेवा करण्याची गरज असल्याचे कारण सांगितले आहे.

Image Credited – patrika

कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अर्जात लिहिले की, या म्हशीच्या दुधानेच मला पोलीस दलात भरती होण्यास मदत केली व हीच वेळ आहे की मी त्याची परतफेड करावी. जवानाने लिहिले की, मी तुमच्या अंतर्गत वाहन शाखेमध्ये कार्यरत आहे. माझ्या आईची तब्येत मागील दोन महिन्यांपासून खराब आहे. घरात एक म्हैस देखील आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करतो. म्हशीने काही दिवसांपुर्वीच रेडकूला जन्म दिला आहे. घरात काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. माझ्या आयुष्यात म्हशीची भूमिका महत्त्वाची आहे. कारण मी भरतीच्या तयारी वेळी तिचेच दूध पिऊन धावायचो. आईचा उपचार करण्यासाठी आणि म्हशीची सेवा करण्यासाठी 6 दिवसांची सुट्टी द्यावी.

पोलीस कर्मचाऱ्याचा हा अर्ज व्हायरल होत आहे. अर्जावर अधिकारी म्हणाले की, आम्ही प्रत्येक अर्ज गंभीरतेने घेतो व कोणालाही सुट्टी देण्यास नकार देत नाही.

Leave a Comment