आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारची मंजुरी


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने अखेर कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना दिलासा दिला असून आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात मदतीला घेण्यात आल्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारे मानधन वाढवण्यात यावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती. अखेर या मागणीवर निर्णय घेण्यात आला. अनेक विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर अनेक विषयांना मंजुरीही देण्यात आली. यात आशा सेविका व गटप्रर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेत सरकारने त्यांना दिलासा दिला आहे.

दरमहा २००० रुपये आशा सेविकांच्या मानधनात, तर दरमहा ३००० रुपये आशा गटप्रर्तकांना मानधनात अशी वाढ करण्यात आली आहे. १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ७१ हजार आशा सेविका कार्यरत आहेत.

Leave a Comment