नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण


मालेगाव – भारत-चीनच्या सीमेला लागून असलेल्या गलवाण खोऱ्यात सीमेवरुन झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे देशभरात चीनविरोधात संताप आणि शहीद झालेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त होत आहे. याचदरम्यान महाराष्ट्राच्या सुपुत्राला गलवाण येथे कर्तव्य बजावत असताना नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. या जवानाचे नाव सचिन मोरे असे आहे. निधनाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे. कर्तव्य बजावताना मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेवर गलवाण येथे पुलाचे काम सुरु असताना दोन जवान नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी धाव घेतली. पण दुर्दैवाने त्यांना वीरमरण आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ११५ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सचिन मोरे सेवा बजावत होते. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment