वर्षभर रखडलेली महावितरणमधील ७,००० जागांची भरतीप्रक्रिया आता आठ दिवसांत होणार पूर्ण


मुंबई – राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७,००० जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्रिया आता पूर्ण होणार असून यामुळे निवड प्रक्रियेतील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भातील माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये जुलै २०१९ मध्ये महावितरणने जाहिरात प्रसिद्ध करून २,००० उपकेंद्र सहायक आणि ५,००० विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे.


युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी ऊर्जामंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राऊत यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर अर्थ विभागाने सध्या कोरोनाच्या संकटामुळे नवीन नोकर भरतीची प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले आणि त्यामुळे युवकांमध्ये एक घबराट पसरली होती. पण या ही परिस्थितीत ज्याठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी भरती करीत राहिल्यास बेरोजगार युवकांना थोडा तरी आधार मिळत राहील, असे तांबे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment