शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने टीका करणे हसण्यासारखे - Majha Paper

शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने टीका करणे हसण्यासारखे


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखे आहे. केवळ प्रसिद्धीत राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची, कालपर्यंत जो माणूस मोदींना शिव्या देत होता आणि त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपत जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवत आहात. शरद पवारांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला येथपर्यंत आणल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

महाराष्ट्रात असे अनेक गोपीचंद झाले आहेत आणि ते पवारांच्या उंचीलाही स्पर्श करु शकत नाहीत. त्यांनी शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकर सहा-आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. मला घ्या अशी विनंती करत होते, असा गौप्यस्फोटही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे. तर भाजपत पवारांबद्दल बोलले की महान नेता असा गोड समज असल्यामुळे हा त्या प्रयत्नाचा भाग आहे. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचे सांगतात. पण यांना करंगळी धरायला मिळणार नाही,असा टोला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Leave a Comment