शरद पवारांवर टीका; फडणवीसांनी टोचले पडळकरांचे कान - Majha Paper

शरद पवारांवर टीका; फडणवीसांनी टोचले पडळकरांचे कान


सोलापूर – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्याशी आपण चर्चा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक असून शत्रू नसल्याचे सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर यांच्याशी मी चर्चा केली असून पवार हे आमचे राजकीय विरोधक असून शत्रू नसल्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे आहे. योग्य ते शब्द कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी वापरले गेले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.

Leave a Comment