गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य; शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना


मुंबई – विधान परिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार यांनी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बहुजन समाजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी शरद पवार सकारात्मक नसून ते फक्त राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, असे माझे मत आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांची राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका कायम राहिली आहे आणि ते ती पुढेही कायम ठेवतील. कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन त्यांच्याकडे नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल शरद पवार सकारात्मक असल्याचे वाटत नाही. या मुद्यावरुन त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. एक हजार कोटींचे पॅकेज तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने घोषित केले होते. पण सरकार गेल्यामुळे त्यांना कारवाई करता आली नाही. पण एक रुपयाही या महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसेच घरांसंबंधी निर्णय आहेत. यावर विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाल्यावर चर्चा करु, असे पडळकर यांनी म्हटले आहे.

वेगवेगळ्या समाजासंबधी सरकार वेगवेगळी भूमिका घेत आहे. न्यायालयात धनगर समाजाचे प्रकरण असतानाही वकील दिला नाही. राज्यात दोन क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाची ही परिस्थिती असेल तर इतर छोट्या घटकांची काय परिस्थिती असेल हे सांगायची गरज नाही. आता लोकांना शरद पवारांची भूमिका कळू लागली आहे. कोरोना संकट संपल्यानंतर शरद पवारांविरोधात आंदोलन करु, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Leave a Comment