मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; लवकर सुरू होणार सलून, ब्युटी पार्लर


गडचिरोली – राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे केशकर्तनालय व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा झाली असून, केशकर्तनालय व पार्लर लवकरच सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बुडाल्याने बेरोजगारीचा सामना राज्यभरातील नाभिक समाजाला करावा लागत आहे. त्यामुळे सर्व केशकर्तनालय व पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. येत्या आठवडाभरात सरकार यासंदर्भात निर्णय घेणार आहे. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोब यापुढे मंगल कार्यालयात ५० वऱ्हाडी व ५ वाजंत्री यांच्या उपस्थितीत लग्न लावता येणार आहे. पण, मंगल कार्यालयात वातानुकुलीत यंत्रणा बंद करावी लागेल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंत गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळेल आणि ते पुढील सत्रात सुरु होईल. शिवाय अत्याधुनिक प्रयोगशाळाही सुरु होणार असून, त्याद्वारे कोरोना व अन्य रोगांचे निदान होऊ शकेल.

तसेच अहेरी व गडचिरोली येथे प्रत्येकी एक अभ्यासिका निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन जागा उपलब्ध करुन देण्याविषयी आदिवासी विकास विभागाला निर्देश दिल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सद्य:स्थितीची कोरोनाविषयक माहिती देऊन प्रशासन व जनतेच्या सहकार्यामुळेच येथील मृत्यूदर अत्यल्प असून, स्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले. याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रेड झोन सोडून उर्वरित भागात आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबतच सरकार विचार करीत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

दरम्यान वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेने अत्यल्प पीक कर्ज वाटप केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. १ लाख २० हजार खातेदारांपैकी केवळ १२ हजार ४८९ खातेदार शेतकऱ्यांनाच बँकांनी पीक कर्ज वाटप केले, असे त्यांनी सांगितले. सर्व गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेच पाहिजे, अशी सरकारची भूमिका असून, लवकरच आयुक्तस्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Leave a Comment