ज्यांचा रामदेव बाबांच्या ‘करोनिल’ औषधावर विश्वास त्यांनीच ते घ्यावे - अजित पवार - Majha Paper

ज्यांचा रामदेव बाबांच्या ‘करोनिल’ औषधावर विश्वास त्यांनीच ते घ्यावे – अजित पवार


मुंबई – जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत सर्वच देश कोरोनावरील लस शोधण्याला प्रथम प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने अशा परिस्थितीत कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केले आहे. हे औषध योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत जगासमोर आणण्यात आले. कोरोनाचे आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हरिद्वारच्या पतंजली योगपीठात लाँच करण्यात आले.

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ज्यांना बाबा रामदेव यांच्या औषधावर विश्वास आहे त्यांनीच ते औषध घ्यावे, असे म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक औषध बाजारात आणण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा प्रतिकार करणारे औषध रामदेव बाबा यांनी आणले आहे. पण त्यांच्या औषधांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ते घ्यावे, असे अजित पवार यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत आज दुपारी कोरोनावरील औषध लाँच करण्यात आले. ज्या क्षणाची संपूर्ण देश आणि जग प्रतीक्षा करत होता, तो क्षण आता आला आहे. कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर या औषधाच्या मदतींने आम्ही नियंत्रण ठेवू शकू, असे मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केले. या औषधाच्या साहाय्याने तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगभरात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, पतंजलीकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसेच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा करण्यात आला होता. हे औषध पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी तयार केले आहे.

Leave a Comment