श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा नवा आरोप; लंकेच्या संघात अंतिम सामन्यात ऐनवेळी बदल


कोलंबो – २०११ झाली मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केल्यानंतर क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांचे लंकेच्या तत्कालीन संघाचा कर्णधार कुमार संगकारा आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलेल्या महेला जयवर्धनेने खंडन केले होते. यानंतर अलुथगमगे यांनी डेली मिरर या वृत्तपत्राशी बोलताना आपण याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल केली असून, कोणत्याही श्रीलंकेच्या खेळाडूंवर आपण आरोप केले नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानतंरच्या वर्षभरातच श्रीलंकन क्रिकेट बोर्डातील काही ठराविक अधिकाऱ्यांनी कंपव्या खरेदी केल्या आणि स्वतःचा स्वतंत्र धंदा सुरु केला, हे कसे शक्य आहे? श्रीलंकेचा जो संघ अंतिम सामन्यात खेळला तो मुळात आम्ही निवडलेला संघच नव्हता. क्रीडामंत्री या नात्याने मी किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा न करता शेवटच्या क्षणाला ४ नवीन खेळाडूंना संघात जागा देण्यात आली. याबद्दल लंकन क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवण्यात आले. हे सगळे मी पाहिले आहे, कारण मी त्या सामन्याच्यावेळी हजर होतो. ४ नवीन खेळाडूंना कोणत्याही चर्चेशिवाय संघात स्थान कसे मिळते. इतरांच्या तुलनेत ४ नव्या खेळाडूंचा अनुभव कमी असल्याचे म्हणत अलुथगमगे यांनी आपली बाजू मांडली.

मी कोणत्याही श्रीलंकन खेळाडूवर या सर्व घटनेत आरोप केला नसल्याचे अलुथगमगे यांनी स्पष्ट केले. क्रीडामंत्र्यांच्या आरोपावर अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धने याने निवडणुका जवळ आल्या आहेत का? कारण सर्कस सुरु झाली असल्याचे खोचक वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना अलुथगमने म्हणाले, संगकारा किंवा जयवर्धनेला यावर व्यक्त होण्याची गरज नाही, मी कोणत्याही खेळाडूवर आरोप केलेला नाही. माझ्या दोन-अडीच मिनीटाच्या मुलाखतीला एवढे का लक्ष्य केले जात आहे. तत्पूर्वी श्रीलंकन संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगानेही मॅच फिक्सींगचे आरोप केले होते.

Leave a Comment