व्हायरल; भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा! - Majha Paper

व्हायरल; भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा!


नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल येथील भाजप कार्यकर्त्यांनी चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याच्या पार्श्वभूमीवर चीनचा निषेध करण्यासाठी एका रॅलीचे आयोजन केले होते. पण, त्यांनी या रॅलीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचा पुतळा जाळल्याचे समोर येत आहे.


भाजपचा कार्यकर्ता व्हायरल व्हिडिओमध्ये निषेध रॅलीबाबत माहिती देताना, चीनचा आम्ही विरोध करत आहोत. लडाखमध्ये जी घटना घडली त्याविरोधात आम्ही निषेध रॅली काढली आहे. चीनचे जे पंतप्रधान आहेत किम जोंग त्यांचा आम्ही पुतळा जाळून निषेध करणार असल्याचे म्हणताना दिसत आहे. चीनचे सामान लोकांनी न वापरता स्वदेशीचा अवलंब करावा, त्याद्वारे चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करु, असेही आवाहन या कार्यकर्त्याने केले.

शी जिनपिंगऐवजी किम जोंग उनचा पुतळा जाळणार असे म्हणणाऱ्या या भाजप कार्यकर्त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, कोणाचा पुतळा निषेध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जाळायचा याचीच माहिती नसल्यामुळे भाजपला यावरुन नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment