श्रीलंकन माजी क्रीडा मंत्र्यांच्या ‘त्या’ दाव्याचा संगकाराने घेतला समाचार


श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी २०११ साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर श्रीलंका आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.


त्यानंतर या आरोपांची श्रीलंकेचा अनुभवी माजी खेळाडू आणि २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धनेने खिल्ली उडवली. त्याचबरोबर श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा याने देखील आपले मत व्यक्त केले. संगकाराने यासंदर्भात एक ट्विट केले असून, त्याने आपल्या ट्विटमध्ये सामना फिक्स असल्याचा दावा केल्यानंतर तो खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्यांची गरज भासेल. याबाबत सुरक्षा यंत्रणा, लाचलुचपच प्रतिबंधक विभाग आणि आयसीसी हे सारे पुरावा दिल्यानंतरच नीट चौकशी व तपास करू शकतात, असे म्हटले आहे.

माजी क्रीडामंत्र्यांचा हा दावा महेला जयवर्धनेने देखील खोडून काढत खोचक ट्विट केले होते. निवडणुका जवळ आल्या वाटते आणि देशात सर्कस सुरु झाल्यासारखे वाटते… पण नावे आणि पुरावे कुठे असल्याचे ट्विट करत माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment