राज्य सरकारची केंद्राकडे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य देण्याची मागणी


मुंबई : देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पण देशावरचा कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नाही. या त्यामुळे जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले असून त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील नागरिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. अशा संकट काळात केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र सरकारच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु झाली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरणास जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ येऊन राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment