सर्वपक्षीयांच्या बैठकीतून एआयएमआयएमला वगळले, ओवेसींचे मोदींना नाराजी पत्र


नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण सीमेलगत चीनी सैनिकांनी जी चकमक घडवली त्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचा विषय चर्चिला जाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण या बैठकीला एआयएमआयएम या पक्षाला बोलवण्यातच आलेले नाही आणि त्यातच हे निराशाजनक असल्याचे म्हणत एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे. सर्वपक्षीय बैठकीचे एआयएमआयएमला निमंत्रण नसल्यामुळे नाराज ओवेसींनी पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.


तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला एआयएआयएमआयएम या पक्षाला न बोलवणे हे निराशाजनक असून चीनबाबत चर्चा होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तुम्ही आहात. एका राष्ट्रीय विषयावरच्या चर्चेसाठी तुम्हाला एआयएआयएमआयएम या पक्षाला बोलवावेसे वाटले नाही का ? तुम्ही सर्वपक्षीय बैठकीसाठी नेमके कोणते धोरण आखले आहे ते आम्हाला माहित नाही. पण लोकसभेत ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षांना बोलावणे तरी किमान अपेक्षित आहे. पण तुम्ही तेही केलेले नाही.

लोकसभेचे खासदार, कॅबिनेट मंत्री आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी हा सर्वपक्षीय बैठकीचा कार्यक्रम असतो. केंद्र सरकारने प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला बोलवण्याची रीत आहे. तरीही आम्हाला बोलवण्यात आलेले नाही. अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीला न बोलावले गेल्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्रही पोस्ट केले आहे.

Leave a Comment