राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर जाणार ‘स्वाभिमानी’ राजू शेट्टी


मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवारांनी विधानपरिषद आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारली असून आज मुंबईत शरद पवारांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता. शब्द पवारांनी तो पूर्ण केला आहे.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा राज्यात रिक्त आहेत. या जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. या 4 जागांपैकी राष्ट्रवादीकडून एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आमदार होण्याची ऑफर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिली होती. यासंदर्भात आज राजू शेट्टी यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारल्यामुळे राजू शेट्टी आता आमदार होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. पण या दोन्ही पक्षांनी सत्ता आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेककडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नाराजीचा सूर होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी देण्यात आली नाही. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळावी असा मेल शेट्टी यांनी पवार यांना केला होता. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने आता संधी देऊन न्याय दिला.

Leave a Comment