पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सुरु करण्यास परवानगी - Majha Paper

पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सुरु करण्यास परवानगी


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झालेले पुणे शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुण्यातील बहुतांश दुकाने आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या असून त्यातच आता पुण्यातील कंटेन्मेंट परिसरातील दुकानांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कंटेंनमेंट परिसरातील 90 टक्के दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोनमधील दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनेकडून मागील काही दिवसांपासून होत होती. याबाबत आज अजित पवार यांनी पोलीस, महापालिका आयुक्त आणि व्यापारी महासंघाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये सुद्धा 90 टक्के दुकाने उघडण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या भागात लॉकडाउनच्या काळात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. आता पुण्यात जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता, तिथेही रुग्ण आढळून आल्यामुळे ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली होती.

Leave a Comment