कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या


मुंबई – बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकाने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जुन्या चाळीतील तसेच झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरे ताब्यात घेण्याची योजना रद्द करावी अशी मागणी केली आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास अंबानींच्या अँटिलिया टॉवरमधील रिकाम्या फ्लॅटमध्ये रहिवासी घुसतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंबंधी बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

या शहरात असंख्य टॉवर उभे राहिले आहेत. केवळ गुंतवणुकीसाठी त्यातील अनेक फ्लॅट्स घेऊन ठेवलेले आहेत. जे रिकामी ते महापालिकेने घ्यावे. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती अंबानी कुटुंबियांची मुंबईत २२ मजल्यांची इमारत आहे. पाच जणांचे कुटुंब आहे. एका व्यक्तीला एक मजला दिला तरी १७ मजले उरतात, अशा प्रकारे मुंबईत अनेक श्रीमंतांचे बंगले आहेत. ते कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ताब्यात घ्या. महालक्ष्मीचे गोल्फ मैदान आहे. त्यांना आधीच उपनगरात जागा दिली आहे. ते ताब्यात घ्या. सर्व पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घ्या. कष्टकऱ्यांच्या घराचा ताबा घेतला तर अंबानींच्या अँटिलियामध्ये भाडेकरु, रहिवासी घुसतील, असा इशारा बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेकडून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर कष्टकऱ्यांच्या मुंबईसारख्या शहरात जुन्या चाळीत आणि झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक अनेक पिढ्या राहत आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा पुनर्विकास प्रलंबित आहे. आपली घरे रिकामी करुन १०, १५, २० वर्ष ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये घरांच्या प्रतिक्षेत आहेत किंवा अनेक ठिकाणी राहत आहेत. विकासकाने अनेक ठिकाणी घरभाडे देणेही बंद केल्यामुळे ते आधीच अडचणीत आहेत. त्यांना ताबडतोब हक्काची घऱे मिळाली पाहिजेत. सरकारने त्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

असे असताना मुंबई महानगरपालिका जे प्रोजेक्ट तयार होण्याच्या अवस्थेत आहेत तेथील घरे कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ताब्यात घेत असून हा रहिवाशांवर अन्याय आहे. मूळ रहिवाशांना या सदनिका देण्याचे कायदेशीर बंधन सरकार, महापालिका, म्हाडा, एसआरए यांच्यावर असून त्यासाठी काहीजण न्यायालयात गेले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान ३१ मे रोजीचे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेने मागे घ्यावे. लाखो मुंबईकरांना या शहरात हक्काची घरे ताबडतोबत मिळालीच पाहिजेत, अशी मागणी बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेने केली आहे. सरकारने बिल्डरांना मोकळ्या जागा आणि बंद पडलेल्या कारखान्याच्या जागा टॉवरसाठी देणे बंद करावे. त्याठिकाणी कायम स्वरुपाची सरकारी रुग्णालये उभारावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Comment