आजपासून मर्यादित स्वरुपात धावणार मुंबईची लाईफलाईन; सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवेश नाही


मुंबई : मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मागणीनुसार मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून सुरु झाली आहे. मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून बंद होती. आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

पण या ट्रेनमधून सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही उपनगरीय सेवा असणार आहे. या ट्रेनमधून शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना प्रवासाचे तिकीट मिळेल आणि त्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करता येईल.

राज्य सरकार मागील अनेक दिवसांपासून मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली जावी यासाठी आग्रही होते. काल (14 जून) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात यासंदर्भात एक महत्वाची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आजपासून सुरु झालेल्या या उपनगरीय सेवेच्या फेऱ्यात कोणाकोणाला प्रवास करता येईल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असणार आहे.

अशी असेल पश्चिम रेल्वेची लोकल सेवा
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू रोडवर उपनगरीय सेवा सुरु झाली असून या मार्गावर अप 73 आणि डाऊन 73 अशा, 12 डब्यांच्या 146 फेऱ्या चालवल्या चाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणाऱ्या या बहुतांश उपनगरीय फेऱ्या विरार आणि बोरिवलीपर्यंत असतील तर उर्वरित डहाणू रोडपर्यंत जातील. पहाटे 5.30 पासून रात्री 11.30 पर्यंत लोकल धावतील. रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65 ट्रेन चर्चगेट ते विरार आणि 8 ट्रेन विरार ते डहाणू रोड मार्गावर धावतील. या ट्रेन चर्चगेट ते बोरिवली मार्गावर फास्ट असतील तर त्यापुढे स्लो होतील.

अशी असेल मध्य रेल्वेची लोकल सेवा
सेंट्रल रेल्वे अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 100 अशा 200 ट्रेन चालवणार आहे. सेंट्रल रेल्वेवरील ट्रेनही वेस्टर्नप्रमाणेच फास्ट ट्रेनच्याच थांब्यांवर थांबतील. या ट्रेन आधी सुरु असलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल ट्रेन वगळून आहेत. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या मेनलाईनवर 130 उपनगरीय सेवा धावतील तर उर्वरित 70 सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर धावतील .

सामान्य मुंबईकरांसाठी या ट्रेन सुरु करण्यात आलेल्या नाही. ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असेल. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनच्या 50 हजार प्रवासांसह राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील एकूण 1.25 लाख कर्मचारी या ट्रेनमधून प्रवास करु शकणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बुकिंग विंडोही सुरु केली जाणार आहे, तिथे ते आपले सरकारी ओळखपत्र दाखवून तिकीट घेऊ शकतात. ओळखपत्राशिवाय स्टेशनच्या आत प्रवेश मिळणार नाही. स्टेशनजवळ पार्किंगची सुविधा मिळणार नाही, तसेच फेरीवाल्यांनाही परवानगी नसेल. रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकारी, चेकिंगद्वारे निश्चित करतील की अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये उपस्थित नसेल.

Leave a Comment