बॉलीवूडमधील कंपूशाहीने घेतला सुशांतचा बळी; कंगनाची आगपाखड


बॉलिवूडमधील अनेक गोष्टी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर येत आहेत. त्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बॉलीवूडमध्ये स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचले जाते, तसेच बॉलीवूडमधील कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनाने केली आहे.

यासंदर्भातील एक व्हिडीओ कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर (नेपोटिझम) निशाणा साधला. कंगना म्हणाली, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांना हादरा बसला आहे. पण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाची ज्या व्यक्तीने स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचे मानसिक संतुलन कसे बिघडलेले असू शकते? त्याच्या गेल्या काही दिवसातील पोस्ट पाहिल्या, तर हे दिसून येते की तो सर्वांना विनवणी करत आहे, की माझे देखील चित्रपट पाहा, माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकतील. हे त्याने त्याच्या मुलाखतींमध्येही वारंवार सांगितले आहे की, मला ही इंडस्ट्री स्वीकारत का नाही? मला एकटे पडल्यासारखे वाटते… हा या दुर्घटनेचा पाया तर नाही ना? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.


त्याच्या 6-7 वर्षांच्या करिअरमध्ये ‘काय पो छे’ सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला कुठल्याही प्रकारची पोचपावती का मिळाली नाही, कुठला अवॉर्ड का नाही मिळाला?, केदारनाथ, एम. एस. धोनी किंवा छिछोरे सारख्या चित्रपटांना अवॉर्ड नाही, आणि गल्ली बॉयसारख्या टुकार चित्रपटाला अवॉर्ड मिळतो मग छिछोरेला का नाही, असा सवाल कंगनाने उपस्थित केला

तुमचे आम्हाला काही नको, तुमचे चित्रपटपण नको, पण आम्ही जे करतो ते तुम्ही का नाही पाहात. ज्या चित्रपटांचे मी दिग्दर्शन केले, त्या चित्रपटांना यांनी फ्लॉप ठरवले, माझ्यावर 6 खटले का चालवण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न का केला गेला, याचा कंगनाने आवर्जुन उल्लेख केला.

सुशांत सिंह राजपूतला काही पत्रकार मनोरुग्ण ठरवत आहेत. त्यांना संजय दत्तचे व्यसन तर तुम्हाला क्युट वाटते. मला हेच पत्रकार मेसेज करतात की, तुझा खूप वाईट काळ सुरु आहे, तू कुठला चुकीचा निर्णय नको घेऊ, असे ते का म्हणत आहेत हेच मला कळत नाही. माझ्या डोक्यात हे का या गोष्टी भरु इच्छितात की मी आत्महत्या करायला हवी. मग ही आत्महत्या होती की खून, असा आरोप कंगनाने केला आहे.

सुशांतची चूक ही होती की त्याने या लोकांचे म्हणणे ऐकले. त्यांनी त्याला वर्थलेस म्हटले आणि त्याने ते मान्य देखील केले. तो त्याच्या आईचे म्हणणे विसरला. या लोकांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना हेच सिद्ध करायचे आहे की सुशांतचे मानसिक संतुलन बिघडलेले होते, ते खरे काय आहे ते नाही सांगणार.पण, आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की इतिहास कोण लिहिणार.

Leave a Comment