पेन्शनसाठी १२० वर्षांच्या आईला खाटेवरुन न्यावे लागले बँकेत


भुवनेश्वर : ग्रामीण भागात नसलेल्या ग्राहकाभिमुख सेवा, सुविधांमुळे नागरिकांना किती अडचणींना सामोर जावे लागते याचे जिवंत उदाहरण नुकतेच माध्यमांसमोर आले आहे. त्याचबरोबर हा धक्कादायक प्रसंग आपल्या व्यवस्थेवर कोरडे ओढणारा ठरला आहे. एका ज्येष्ठ महिलेला बँकेच्या सूचनेनुसार आपल्या १२० वर्षांच्या आईच्या पेन्शनसाठी खाटेवर टाकून बँकेत घेऊन जावे लागले. गुरुवारी ही घटना ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील खरिअर ब्लॉकमधील बारगन गावात घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील आपल्या पेन्शन अकाऊंटमधून १,५०० रुपये काढण्यासाठी १२० वर्षांच्या वृद्ध महिलेने आपली ७० वर्षीय मुलगी गुंज देई यांना बँकेत पाठवले. गुंज देई ज्यावेळी बँकेत पोहोचल्या तेव्हा त्यांना पेन्शनची रक्कम देण्यास बँक अधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच बँकेत खातेधारक महिलेला प्रत्यक्ष हजर करण्यास सांगितले. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिले आहे.

गुंज देई या देखील स्वतः ज्येष्ठ नागरिक असून १२० वर्षे वय असलेल्या त्यांच्या आईला चालता येत नाही आणि त्या अंथरुणाला खिळून असल्यामुळे आपल्या आईला एका खाटेवर आईला टाकून ओढत बँकेत नेण्याशिवाय गुंज देई यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. गुंज देई जेव्हा आपल्या आईला खाटेवरुन घेऊन बँकेत पोहोचल्या तेव्हा त्या दोघींचे वय आणि अवस्था पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने पेन्शनची रक्कम काढून दिली.

दरम्यान, सोशल मीडियात गुंज देई यांनी आपल्या आईला खाटेवरुन ओढत बँकेत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. स्थानिक प्रशासनाला देखील या घटनेची दखल घेणे भाग पडले. सर्व प्रकारच्या बँकांच्या मॅनेजर्सना प्रशासनाने लिखित आदेश दिले की, बँकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा पुरवण्यात यावी.

Leave a Comment