प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी केली आत्महत्या


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतने मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतसिंग राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘क्या पो छे!’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्र सिंग धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती.

नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण त्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

त्याचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला होता. दिल्लीमधून त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment