ठाकरे सरकारचा दिलासा; आता अर्ध्या किंमतीत होणार कोरोना चाचणी


मुंबई – देशात कोरोना व्हायरसने सर्वाधिक थैमान महाराष्ट्रात घातले असल्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे राज्यातील ठाकरे सरकारने स्पष्ट केले आहे. पण लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथील करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे रस्त्यांवर आता नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच दरम्यान आता कोरोनाच्या चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात महाराष्ट्र सरकारने कपात केली आहे. त्यानुसार राज्यातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी 4400 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत.

सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचणीचे रिपोर्ट्स येण्यासाठी काही कालावधी लागत होता. त्याचबरोबर चाचणीसाठी सुद्धा भरघोस शुल्क देखील आकारण्यात येत होते. परंतु कोरोना चाचणी करण्यासाठी आकारण्यात येणारे हे शुल्क सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असावेत असे ही सांगण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांकडून आता कोरोना चाचणीसाठी फक्त 2200 रुपये स्विकारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर घरुन नमूने गोळा करण्यासाठी जास्तीत जास्त 2800 रुपये मोजावे लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment