मोदींच्या निर्देशानंतर पुण्यातील एक पेट्रोल पंपच झाला चक्क आत्मनिर्भर


पुणे : सर्वसामान्यपणे पेट्रोलपंपावर आपण गेल्यास आपल्या गाडीत पेट्रोल अथवा डिझेल तेथील कर्मचारीच भरतो, त्यातच तेथे कार्यरत असलेला कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे आपल्याला ताटकळत बसावे लागते. पण आता या सर्वांवरही एक उपाय सापडला असून पुण्यात एक आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरु करण्यात आला आहे. तुम्ही जर या पेट्रोलपंपावर गेलात तर तुम्ही स्वतः पेट्रोल अथवा डिझेल भरू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. हा आत्मनिर्भर पेट्रोलपंप मागील दोन दिवसांपासून सुरु करण्यात आला आहे. हा पेट्रोलपंप पुण्यातील आरटीओ चौकात असून अनेक पुणेकरांनी मागील दोन दिवसात या आत्मनिर्भर पेट्रोलपंपावर जाऊन स्वतः पेट्रोल भरले आहे.

या पेट्रोलपंपावर गेल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाला सॅनिटायझर दिले जाते. त्यानंतर तेथील कर्मचारी संबंधित ग्राहकाला पेट्रोल कसे भरायचे याविषयी सूचना देतो. त्यानंतर पुढची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकालाच करावी लागते. आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरु करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.

आत्मनिर्भर पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या एका ग्राहकाने या प्रतिक्रिया देताना म्हटले की, यापूर्वी पेट्रोल भरताना कर्मचाऱ्यांनीच पेट्रोल चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल भरल्यानंतर आपल्याला खरच योग्य पेट्रोल मिळाले का? अशी शंका मनात यापूर्वी यायची. पण आता या आत्मनिर्भर पेट्रोलपंपामुळे मनातील शंका दूर होतील. कारण आपण स्वतः झिरो सेट करण्यापासून ते पेट्रोल गाडीत टाकेपर्यंत सर्व प्रक्रिया करीत असतो. त्यामुळे आपण स्वतः निर्धास्त असतो. यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होईल.

यासंदर्भात माहिती देताना आत्मनिर्भर पेट्रोलपंपाचे मालक असलेले गिरीश मानकर यांनी सांगितले की, अनेक पुणेकरांच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरताना कर्मचारी पेट्रोल मारतात अशा तक्रारी होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे. आमच्या येथे येणाऱ्या ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे ही यामागची भावना आहे. दोन दिवसांपासून आम्ही हा प्रयोग सुरु केला असून लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

Leave a Comment