महाराष्ट्रात रेमडेसीवीरच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने रेमडेसीवीर (Remdesivir) या अ‍ॅन्टी व्हायरल औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. रेमडेसीवीर हे कोरोनाविरोधातील प्रभावशाली औषधांपैकी एक आहे. दरम्यान राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय कॉलेज आणि 4 मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुरूवातीला देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

रेमडेसीवीर क्लिनिकल ट्रायल बद्दलची ऑर्डर डॉ. तात्याराव लहाने यांनी इश्यू केली आहे. DMER ने निवडलेल्या हॉस्पिटल्सच्या समितींना ट्रायल सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार सुरुवातील रेमडेसीवीरची 3,000 इंजेक्शन घेणार असून ते सुमारे 18 मेडिकल कॉलेजेसना देणार आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि रूग्णांच्या कुटुंबाकडून परवानगी मिळाल्यानंतरच याचा वापर केला जाणार आहे. बीडीआर फार्मास्युटिक्लस आणि हेटेरेओ या कंपन्या सुरुवातीला ट्रायल्ससाठी मोफत औषधे उपलब्ध करून देणार आहेत. त्यानंतर बांग्लादेशी कंपनी बेक्सिमकोसोबत प्रत्येक बाटलीसाठी 65 डॉलर आकारणार आहे.

देशात सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच कोरोनाचा सर्वाधिक धोका देशाची आर्थिक राजधानी मुंबईला आहे. कोरोनाबाधितांची दिवसागणिक वाढती संख्या चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. पण, राज्यात मागील 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.

Leave a Comment