महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असून या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा फटका राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांना देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत. काल रात्री उशीरा त्यांचा कोरोना रिपोर्ट आला.

याआधी कोरोनाची महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आता मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.

दरम्यान काल दिवसभरात राज्यात 3607 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 एवढी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.

Leave a Comment