पॅरोलवर सुटलेला कैदी म्हणतो, माझ्या बॉडीवर करा कोरोनाचे संशोधन


सोलापूर : कोरोनाचा फार्स राज्याभोवती दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून या रोगाचा समूळ नाश होण्यासाठी सरकार अन् प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण अद्याप कोरोनावर कोणतीही लस, तसेच ठोस उपचार अद्याप सापडलेला नाही.

जगभरातील संशोधक माकडावर कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रयोग करत आहते. त्यातच आता राज्यातील एका कैद्याने वेगळीच मागणी करून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. सोलापुरात पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या एका कैद्याने कोरोनाचे संशोधन माझ्या बॉडीवर करा, अशी मागणी केली आहे.

माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पॅरोलवर असलेला कैदी गणेश हनुमंत घुगे याने ही मागणी केली आहे. आपले स्वतः चे जीवन कोरोना लसीच्या संशोधनासाठी अर्पण करण्यासाठी आपण तयार असल्याचे गणेश घुगे याने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलं आहे. एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावचा गणेश घुगे हा रहिवासी आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात गणेश घुगे हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या तो कोरोना पॅरोलवर बाहेर आला आहे. कोरोना लस संशोधनाच्या कामासाठी जगभरात माकडासह अन्य प्राण्याचा वापर केला जात आहे. दरम्यान कोरोनाच्या आजारावर उपचार संशोधनासाठी माझे शरीर मी स्वच्छेने देण्यास तयार आहे. शासनामार्फत जर अशी संधी मिळाली तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मी समजेन. देशासाठी, समाज हितासाठी माझे जीवन उपयोगी यावे असे मला प्रकर्षाने वाटते, असेही कैदी गणेश घुगे यांनी प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment