लोणार सरोवराचे पाणी अचानक झाले आहे गुलाबी, काय आहे कारण ?

जगभरात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्याचे समोर आले आहे. या सरोवरची निर्मिती 50 हजार वर्षांपुर्वी पृथ्वीवर उल्कापिंड धडकल्याने झाल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर सरोवराच्या पाण्याचा अचानक झालेला बदलेला रंग चर्चेचा विषय ठरत आहे. या बदला मागचे ठोस कारण समोर आलेले नसले तरी यामागे खारेपाणी आणि शेवाळ असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, सरोवरच्या पाण्याचा रंग अशाप्रकारे बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यंदा हा बदल स्पष्ट दिसत आहे. लोणार सरोवर संरक्षण आणि विकास समितीचे सदस्य गजानन खरात यांच्यानुसार, हे सरोवर अधिसूचित राष्ट्रीय भौगोलिक वारसा स्मारक असून, याचे पाणी खारट आहे. ज्याचा पीएच स्तर 10.5 आहे.

त्यांनी सांगितले की, पाण्यात शेवाळ आहे. पाण्याचा रंग बदलण्याचे कारण खारटपणा आणि शेवाळ असू शकते. पाण्याच्या पृष्ठभागापासून एक किमी आत ऑक्सिजन नाही. इराणच्या एका सरोवराचे पाणी देखील खारेपणामुळे लाल झाले होते. या प्रकरणावर लोणारचे तहसीलदार सैफान नदान म्हणाले की, मागील दोन-तीन दिवसांपासून सरोवरच्या पाण्याचा रंग बदलल्याचे आम्ही पाहिले. वनविभागाला नमून गोळा करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याचे कारण समजेल.

दरम्यान, या सरोवराच्या बदलेल्या पाण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment