दिलासादायक : देशात पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या पुढे गेली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या


मुंबई – काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ९,९८५ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे. दरम्याने देशातील विविध राज्यांमध्ये दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्याप्रमाणात वाढत आहे. देशात असे पहिल्यांदाच घडले आहे, की कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या पुढे गेली आहे.

देशात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार २०६ जणांनी या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याचबरोबर देशातील १ लाख ३३ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत एकूण ७,७४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले आणि कोरोनाचे सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाले नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे.

एकीकडे मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून महिन्यातील पहिल्या नऊ दिवसात कोरोनामुळे दररोज सरासरी ५३ मृत्यू झाले आहेत. हेच मे महिन्यात शेवटचे नऊ दिवस कोरोनामुळे दररोज सरासरी ४१ मृत्यू झाले होते. मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. मुंबईत कोरोनामुळे जून महिन्यात आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी कोरोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.

Leave a Comment