इंग्लंडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ‘हा’ संघ रवाना


नवी दिल्ली – जगभराला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केला होता. पण या लॉकडाऊनचा उद्योग विश्वासोबतच क्रीडा विश्वाला देखील फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मार्च महिन्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत बीसीसीआयने देखील आयपीएल 2020 ही स्पर्धा स्थगित केली आहे. पण कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसीने आता विविध प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार या प्रयत्नांना आता यश मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचे वेळापत्रक इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले असून वेस्ट इंडिजचा संघ त्यासाठी आज इंग्लंडमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जून महिन्यात वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा हा होता. पण या वेळापत्रकात कोरोनाच्या तडाख्यामुळे बदल करण्यात आला. त्यानुसार ८ जुलैपासून आता या मालिकेला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नव्या नियमांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालिका सुरू होण्याच्या महिनाभर आधीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांविनाच हे सर्व कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. संघ इंग्लंडसाठी प्रयाण करत असल्याचा एक छोटा व्हिडीओ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे.


या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिज संघातील डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या ३ खेळाडूंनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे कारण देत इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याचे वृत्त डेली मेलने दिले होते. त्यावर, सध्याच्या खडतर काळात मंडळ कोणत्याही खेळाडूवर दौऱ्यावर जाण्याची बळजबरी करणार नाही, असे विंडीज क्रिकेट मंडळाने स्पष्ट केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

दरम्यान ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना ८ ते १२ जुलैदरम्यान एजेस बाऊल येथे, दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै या कालावधीत तर तिसरा कसोटी सामना २४ ते २८ जुलै या कालावधीत ओल्ड ट्रॅफर्ड येथेच खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल

Leave a Comment