देशात सलग सातव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर


नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. देशात मागील सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासांत ९ हजार ९८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर काल दिवसभरात तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देश अनलॉक होत असतानाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

आतापर्यंत देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ एवढी झाली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. सध्या एक लाख २९ हजार ९१७ जणांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.

दरम्यान दहा राज्यांमधील ३८ जिल्हाधिकारी व ४५ महापालिका आयुक्तांशी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदन यांनी चर्चा करून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, राजस्थान, हरयाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर या बैठकीत अधिकाधिक नमुना चाचण्या घेणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, विलगीकरण केंद्रे व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

Leave a Comment