परप्रांतीय मजूरांची पुन्हा महाराष्ट्रात वापसी ?


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या स्वगृही परतलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात परतत असल्याचे चित्र सध्या आहे. कारण अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेंमधून अंदाजे 20 हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत. परप्रांतीय मजूर कोरोना संकटामुळे लॉकडाऊनदरम्यान आपआपल्या गावी गेले होते. पण ते आता पुन्हा हळूहळू परतू लागल्याचे चित्र आहे.

काल 7 जूनला मुंबईत वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 01094 क्रमांकाची रेल्वे निर्धारित वेळेत पोहोचली. या रेल्वेने 594 प्रवासी मुंबईत आले. यापैकी 163 कल्याण, 198 ठाणे, 210 दादर आणि 23 प्रवासी सीएसएमटीवर उतरले. संबंधित मनपा, जसे कल्याण डोंबिवली, ठाणे आणि बीएमसीने या स्थानकांवर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करुन, त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.

मुंबई आणि उपनगरात 3 जून ते 7 जून या चार दिवसात जवळपास 20 प्रवासी रेल्वेने आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 60 गाड्या मध्य रेल्वेने सोडल्या. या विशेष रेल्वेमधून जवळपास 20 हजार प्रवासी मुंबईत पुन्हा दाखल झाले. तर तीन रेल्वे पुण्यात दाखल झाल्या असून, तिथे 1200 प्रवासी उतरले.

दरम्यान, स्थलांतरित मजूर अद्याप परतलेलेच नसल्याचा दावा काँग्रेस नेते नसीम खान यांनी केला आहे. हे मजूर लवकर परतण्याची शक्यता कमी आहे. कारण लॉकडाऊननंतर आता मुंबईत पाऊस सुरु होईल, लोकांच्या हाताला काम नाही. जे चालत गेले आहेत, ते काही काळ तिकडेच थांबून सर्व काही सुरळीत झाल्यानंतरच येतील, असे नसीम खान म्हणाले. जे लोक लॉकडाऊनपूर्वी आधीच जाऊन तिकडे अडकले होते, ते आता मुंबईत परतत असल्याचे नसीम खान यांनी नमूद केले आहे.

दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जे परप्रांतीय मजूर मुंबईत परतत आहेत त्यांच्या नोंदी ठेवून संपूर्ण माहिती सरकारला द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या सर्व मजुरांची माहिती असावी, तसेच कामगार कायद्यानुसार काम व्हावे, अशी देखील मागणी केली आहे.

Leave a Comment