आजपासून सुरु होणार नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट


मुंबई : देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि रेस्टॉरंट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद होती. पण आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात हीच शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि रेस्टॉरंटपुन्हा एकदा सुरु होणार आहेत. पण फक्त नॉन कंटेन्मेंट झोनमधीलच मॉल, धार्मिक स्थळे आणि हॉटेल सुरु होणार आहेत हे लक्षात असु द्या. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातील नव्या नियमांनुसार तेथे प्रवेशासाठी टोकन यंत्रणेसारख्या व्यवस्था असेल. तर मंदिरांमध्ये प्रसाद दिला जाणार नाही. 1 जूनपासून देशात अनलॉक 1.0 सुरु झाला आहे, तर कन्मेंन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल अनलॉक 1.0 च्या या टप्प्यात सुरु करता येणार आहे. परंतु प्रत्येक राज्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानुसार नियम जारी केले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने नुकतीच लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये बरीचशी सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम म्हणत ‘मिशन बिगिन अगेन’ हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला.

जाणून घ्या देशातील कोणत्या राज्यात काय सुरु आणि बंद असणार?

  • महाराष्ट्र : आजपासून महाराष्ट्रातील मिशन बिगिन अगेनच्या 3 टप्प्याला सुरुवात होणार आहे. 10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु होणार आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राज्यात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्यास अद्याप परवानगी नाही.
  • दिल्ली : राजधानीतील धार्मिक स्थळे, मॉल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. तर हॉटेल आण बँक्वेट हॉल बंदच राहतील. याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तर हॉटेल आणि बँक्वेट हॉल रुग्णालयाशी अॅटच करावे लागू शकतात किंवा आयसोलेशन बेड्ससाठी यांची गरज लागू शकते
  • उत्तर प्रदेश : आजपासून उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडली जाणार आहेत. यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. धार्मिक स्थळी एकाच वेळी पाचपेक्षा जास्त भाविक गोळा होऊ शकणार नाही. मास्क लावून सॅनिटायजर लावून आणि थर्मल स्क्रीनिंग करुनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मूर्तींना हात लावण्याची परवानगी नसेल, तसेच प्रसादाचे वितरण होणार नाही. शॉपिंग मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये थर्मल स्क्रीनिंग आणि अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर अनिवार्य असेल. वृद्ध, गर्भवतींना बंदी तसंच आजारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवता येणार नाही. फूड कोर्ट किंवा रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के क्षमतेने ग्राहकांनी आसनव्यवस्था असावी. बिलासाठी कॅशलेस ट्रान्झॅक्शनची व्यवस्था करावी. डिस्पोजेबल मेन्यू असावा आणि उत्तम प्रतीचे नॅपकिन पेपर ठेवणे अनिवार्य आहे.
  • बिहार : बिहारमध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत.
  • झारखंड : झारखंडमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट पुढील आदेश येईपर्यंत सुरु करता येणार नाहीत.
  • मध्य प्रदेश : आजपासून राज्यातील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. परंतु राजधानी भोपाळमध्ये धार्मिक स्थळे बंदच राहतील. भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण पिथोडे यांनी सांगितले की, आढावा बैठक झाल्यानंतर पुढील आठवड्यात धार्मिक स्थळे सुरु केली जाऊ शकतात.
  • छत्तीसगड : राज्यातील सार्वजनिक उद्याने, धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. क्लबमध्ये केवळ आऊटडोर अॅक्टिव्हिटीच होऊ शकतात. स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये आऊटडोर खेळच होतील. शॉपिंग मॉल सुरु होणार नाहीत. रेस्टॉरंटमध्ये केवळ टेकअवेची सुविधा असेल. हॉटेल सामान्यांसाठी सुरु होतील.
  • राजस्थान : आजपासून राजस्थानमधील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि क्लब सुरु होणार आहेत. परंतु राज्य सरकारने अद्याप धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
  • कर्नाटक : कर्नाटकमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत. पण चर्च 13 जून पासून सुरु होतील. यासाठी तयारीचे कारण सांगितले जात आहे. या दरम्यान सरकारने जारी केलेल्या एसओपीचे पालन करावे लागणार आहे.
  • पंजाब : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये डायनिंग नसेल. केवळ टेकअवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मिळतील. हॉटेलमध्ये गेस्ट रुम सर्व्हिसमधून जेवण दिले जाणार आहे. सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत धार्मिक स्थळे सुरु राहतील. एकाच वेळी 20 पेक्षा जास्त भाविक जमा होऊ शकणार नाहीत. कोवा अॅपशिवाय पंजाबच्या मॉलमध्ये एण्ट्री नसेल. मॉलमध्ये टोकन सिस्टम लागू असेल.
  • हरियाणा : गुरुग्राम आणि फरीदाबाद हे जिल्हे वगळता हरियाणा सरकारने आजपासून संपूर्ण राज्यात नियमित आणि प्रतिबंधित पद्धतीने धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे तसेच शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये मागील दहा दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता सध्या तिथे मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे सुरु होणार नाहीत. इतर जिल्ह्यांमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल सुरु असतील. तर रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.
  • गुजरात : गुजरातमध्ये आजपासून धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. पण मंदिरे सुरु करण्याबाबत मंदिर ट्रस्ट आपापल्या सोयीने तारीख निश्चित करु शकतात. बनासकांठामधील अम्बा जी मंदिर 12 जूनपासून सुरु होणार असून सोमनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले होईल. सोमनाथ मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तर 15 जूनपासून बीएपीएस ट्रस्टचे मंदिर खुले होणार आहेत.

Leave a Comment