राऊत साहेब, तर तुम्ही देखील सोनू सूदप्रमाणे 'फेमस' होऊ शकता - Majha Paper

राऊत साहेब, तर तुम्ही देखील सोनू सूदप्रमाणे ‘फेमस’ होऊ शकता


मुंबई – कालच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून स्थलांतरितांसाठी देवूदत ठरलेल्या अभिनेता सोनू सुदवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. त्यावरुन सोनूची भाजप नेत्यांकडून पाठराखण करण्यात आली होती. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. राऊत साहेब जर महाराष्ट्रातील रुग्णांची अवस्था सुधारली तर तुम्हीही सोनू सूदप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर “जर कोरोना रुग्णांना तुम्ही दिलासा देण्याचे काम केले, तर सामना प्रेसवर येऊन मी स्वत: तुमच्या पाया पडायला तयार असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.


ट्विटरवर एक व्हिडिओ संदीप देशपांडे यांनी शेअर केला असून त्यांनी याद्वारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाहीत. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे. प्रायव्हेटवाले वाटेल ते बील आकारत आहेत. रुग्णांची अशी सध्या अवस्था आहे. मला असे वाटते ही जर रुग्णांची अवस्था आपण सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे फेमस होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर या रुग्णांना दिलासा देण्याचे काम आपणही केले, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार असल्याचे व्हिडीओत संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, सोनूच्या कामावर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री सोनू सूदने ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Leave a Comment