वेलिंग्टन – न्यूझीलंडने आपल्या देशाच्या सीमा बंद करून तब्बल तीन महिन्यांनंतर आपल्या देशातून कोरोनाला यशस्वीरित्या हद्दपार केले आहे. न्यूजीलंडमध्ये सध्या कोरोनाचे संक्रमण शुन्य असून तिथे मागील 17 दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण सापडलेला नाही. कोरोनाचा शेवटचा रूग्ण बरा झाल्याची सोमवारी न्यूझीलंडने घोषणा केली आणि सोशल मीडियावर न्यूझीलंडमधील लोकांनी सेलिब्रेशनला सुरूवात केली.
न्यूझीलंडची कोरोनावर मात; मागील 17 दिवसांपासून सापडला नाही एकही रूग्ण
न्यूझीलंडमध्ये मागील 17 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रूग्ण सापडलेला नाही. 50 वर्षांहून अधिक वयाचा न्यूझीलंडमधील कोरोनाचा शेवटचा रुग्ण होता. 49 लाख न्यूझीलंडची लोकसंख्या असून न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण 28 फेब्रुवारीला सापडला होता. तर न्यूझीलंडमधील दीड हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले.
न्यूझीलंडमधील सीमा 19 मार्चपासून बंद करण्यात आल्या, त्यावेळी तीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या दरम्यान लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. लॉकडाऊनचे कठोर आणि काटेकोरपद्धतीने पालन केल्यानंतर खाद्यपदार्थांची दुकाने उघडण्यात आल्यानंतर व्यापार उद्योगधंदे सुरू झाले. कोरोनाचा संसर्ग एप्रिलपासून कमी होऊ लागला आणि हळूहळू कोरोनारूग्णांची संख्या कमी झाली. न्यूझीलंडने जरी कोरोनावर मात केलेली असली तरी अद्याप देशाच्या सीमा उघडलेल्या नाहीत अशी माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी दिली आहे.