महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारुवर कर वाढवण्याची मागणी


मुंबई : इंधनाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली नव्हती. पण आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता असून पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. आज मुंबईत पेट्रोल 58 पैशांनी महागल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागत आहेत. 58 पैशांची वाढ डिझेलच्या दरातही झाल्यामुळे डिझेलचा दर मुंबईत 69.37 रुपयांवर गेला आहे.


कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था खालावली आहे. लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल कमी झाला असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट सरकारने 2 रुपयांनी वाढवला होता. मनसेने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सरकारने महिनाभरापूर्वीच दारु विक्रीला परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर देशभर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक राज्य सरकारांनी दारुवर भरमसाठ करही लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. इंधनाच्या किंमतीत शेवटचा बदल 16 मार्च रोजी झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती.

Leave a Comment