चीनलाही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने टाकले मागे


मुंबई -देशात सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत काल ३००७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात कोरोनामुळे ९१ जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या रविवारी ८५ हजार ९७५ वर पोहोचली होती. त्यामुळे महाराष्ट्राने कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येत चीनलाही मागे टाकले आहे.

८५ हजार ९७५ वर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या पोहोचली तर सध्या चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या ८३ हजार ०३६ एवढी आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी अर्ध्या रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ४३ हजार ५९१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ३९ हजार ३१९ जणांना उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही ४८ हजार ७७४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे केवळ मुंबईत १ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ५ लाख ५१ हजार ६४७ लोकांचे रविवारपर्यंत नमूने तपासण्यात आले. त्यापैकी ८५ हजार ९७५ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण चाचण्यांच्या संख्येच्या १५.५८ टक्के एवढी ही संख्या आहे. आतापर्यंत ८३ हजार ०३६ कोरोनाबाधितांची चीनमध्ये नोंद करण्यात आली. त्यापैकी ६८ हजार कोरोनाग्रस्तांची हुबेई प्रांतातच नोंद झाली. तर आतापर्यंत ४ हजार ५०० जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र समजले जाणारे वुहान हे शहरदेखील हुबेई प्रांतातच आहे.

Leave a Comment