दाऊदच्या मृत्यूवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया


चंद्रपूर : पाकिस्तानच्या कराची शहरात कोरोनामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सर्वच माध्यमांमध्ये सुरु आहे. याबाबतचे अनेकजण अंदाज वर्तवत आहेत, पण याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी सरकारने केलेली नाही. दरम्यान, दाऊदच्या मृत्यूबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता त्यांनी हसत हसत या प्रश्नाला बगल दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज अनिल देशमुख यांनी चंद्रपुरात एक बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी जिल्हा प्रशासनाने कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या कामगिरीचे यावेळी कौतुक केले.

दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी दाऊदच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणे टाळत तुम्ही थेट कराचीत पोहोचला, आधी चंद्रपूरचे बघूया, असे अनिल देशमुख म्हटले. यावेळी अनेक विषयांवर अनिल देशमुख यांनी भाष्य केले. राज्य सरकारने कोरोना निवारणासाठी निधी खर्च न केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. श्रमिक रेल्वे तिकिटाव्यतिरिक्त राज्य सरकारने कुठला खर्च केला? असा सवाल विचारत या विषयावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिले. चंद्रकांत पाटील यांच्या मागणीचा विचार करु, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर याशिवाय राज्याने उत्तम कामगिरी केल्याचे देखील ते म्हणाले.

लॉकडाऊन असताना औरंगाबाद जिल्ह्यातील हरसुल कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली. याबाबत प्रश्न विचारला असता राज्यातील सर्वच कारागृहात सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. पण दूध अथवा भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांमार्फत कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला. चंद्रपुरात दारुबंदी लागू आहे. दारुबंदी उठवण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्र्यांनी एक समिती गठीत करत अहवाल शासनाला सादर केला आहे. ही दारुबंदी उठविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कोरोनाचे सावट दूर झाल्यावर यावर अंतिम निर्णय घेऊ अशी भूमिका व्यक्त केली.

Leave a Comment