मुंबईत आता एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती


मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून राज्यासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागस्तरावर पालिका प्रशासनाकडून हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत सर्वाधिक असल्यामुळे मुंबईतील जवळपास सर्वच रुग्णालये खच्चाखच भरलेली आहे. वेळेवर खाटा उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्यामुळे रुग्णांना योग्य माहिती देण्यासाठी पालिका प्रशासन प्रभाग स्तरावर उद्यापासून हेल्पलाईन सुरू करणार आहे. वेगळी वॉररूम यासाठी तयार करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना या वॉररूममधून मुंबईत तुमच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये किती खाटा उपलब्ध आहे याची माहिती दिली जाणार आहे.

मुंबईतील 24 वॉर्डमधील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यावर ती कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार, संबंधित रुग्णाला कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहे, याची माहिती दिली जाणार आहे. 24 वॉर्डसाठी प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली या वॉररूममध्ये काम चालणार आहे. यामुळे वेगवेगवळ्या वॉर्डमधील रुग्णांना या हेल्पलाईनमुळे कुठल्या रुग्णालयात जायचे आहे, याबद्दल माहिती मिळणार आहे.

दरम्यान, खासगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी 5 सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व देखील सोपविण्यात आले होते.

मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी वर्ष 2007 च्या तुकडीतील सनदी अधिकारी मदन नागरगोजे व अजित पाटील, वर्ष 2008 च्या तुकडीतील राधाकृष्णन, 2009 च्या तुकडीतील प्रशांत नारनवरे आणि वर्ष 2011 च्या तुकडीतील सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे.

दरम्यान सरकारी दरानुसारच खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

Leave a Comment