खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री


पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न व्हावेत. लॉकडाऊन संदर्भातील नियम, केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसेच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धेतसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरू करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी प्रयत्न केले जातील व विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या स्थिती, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंन्टेनमेंट झोननिहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी तसेच शाळा सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक तथा साथरोग नियंत्रणचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या विचारात घेता त्यांना तिथेच उपचाराचे नियोजन करावे, असे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी डॅशबोर्ड स्थापन करण्यात आला आहे. या डॅशबोर्डची सुविधा संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णालयातील बेड च्या उपलब्धतेची माहिती या डॅशबोर्ड वर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅशबोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल. पुणे शहरासह पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी झोपडपट्टी व प्रतिबंधीत क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन कालावधीत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. साखर आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना उपाययोजना तर जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या सोईसुविधेबाबत सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोरोनाबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment